जळगाव : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या वचनाचा सण मानला जातो. मात्र, जळगाव शहरात याच पवित्र सणाच्या दिवशी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. दशरथनगर परिसरात राहणाऱ्या रोहित साहेबराव धनगर (वय १८) या तरुणाने रक्षाबंधनाच्या दिवशी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोबाईल गेमच्या आहारी जाणे आणि त्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांमुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हा आपल्या आई-वडील आणि लहान बहिणीसोबत दशरथनगर (आसोदा रोड) येथे राहत होता. शुक्रवारी (२८ ऑगस्ट) सकाळी घरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात साजरा झाला. लहान बहिणीने भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली, त्याचे औक्षण केले आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. रोहितनेही बहिणीला आयुष्यभर तिच्या पाठीशी उभा राहण्याचे आश्वासन दिले. सणानिमित्त घरात आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर त्याने आईला मामाच्या गावी जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर सोडले. दिवसभरात सर्व काही सुरळीत असल्याचे कुटुंबीयांना वाटत होते. याच दरम्यान रोहितने आपल्या मोबाईलवर ‘हॅपी रक्षाबंधन ताई’ असे स्टेटसही ठेवले होते. त्यामुळे त्याच्या मनात इतका मोठा मानसिक संघर्ष सुरू आहे, याची कुणालाही कल्पना आली नव्हती. दुपारी रोहित आपल्या वडिलांसोबत मेहरुण परिसरातील आत्याच्या घरी गेला होता. मात्र, दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास “माझं एक काम आहे, मी थोड्या वेळात येतो,” असे सांगून तो तेथून निघाला आणि थेट दशरथनगर येथील घरी परतला. त्या वेळी घरात कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेत त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात घडलेले दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. सकाळी ज्या हातावर बहिणीने प्रेमाने राखी बांधली होती, त्याच हातावर राखी असलेल्या अवस्थेत भावाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला. “माझ्या भावाला काय कमी होतं? त्याने असं का केलं?” असा बहिणीचा आर्त सवाल उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला. आई-वडिलांनीही एकुलत्या मुलाला गमावल्याच्या दुःखात हंबरडा फोडला. ऐन सणाच्या दिवशी आनंदाचे वातावरण क्षणार्धात दुःखात बदलल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत मोबाईल गेम आणि त्यातील आर्थिक व्यवहारांमुळे रोहित मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, याचा सखोल तपास सुरू असून त्यासाठी त्याचा मोबाईल, ऑनलाइन व्यवहार आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी केली जात आहे. कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे ऑनलाइन गेमिंगचे वाढते व्यसन, त्यामधील आर्थिक व्यवहार आणि त्याचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तज्ज्ञांच्या मते, मोबाईल गेमचे अतिरेकी व्यसन, आर्थिक नुकसान किंवा मानसिक तणाव जाणवत असल्यास ते मनात दडवून न ठेवता कुटुंबीय, मित्र किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर मिळालेला भावनिक आधार अनेकदा अशा टोकाच्या घटना टाळण्यास मदत करू शकतो. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण समाजाला मानसिक आरोग्याविषयी अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित केली आहे.






