नागपूर : राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांचे शुद्धीकरण अंतिम टप्प्यात आले असून ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. मतदारांना आपले नाव ceo.maharashtra.gov.in आणि voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन तपासता येणार आहे. तसेच संबंधित मतदान केंद्राच्या बीएलओ (Booth Level Officer) यांच्याकडूनही मतदार यादीची माहिती मिळू शकते. निवडणूक विभागाने केवळ नाव तपासण्यापुरते मर्यादित न राहता, मतदारांनी आपल्या नोंदीतील सर्व माहिती बारकाईने पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये नावाचे स्पेलिंग, जन्मतारीख किंवा वय, पत्ता, छायाचित्र, मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती अचूक आहे का, याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास ती दुरुस्त करण्यासाठी नमुना क्रमांक ८ (Form 8) भरून अर्ज करता येणार आहे. विशेषतः वृद्ध नागरिक, स्थलांतरित कुटुंबातील सदस्य किंवा एसआयआर मोहिमेदरम्यान ज्यांची पडताळणी झाली नाही, अशा मतदारांनी आपली नावे काळजीपूर्वक तपासावीत, असेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
मतदार यादीत नाव नसल्यास घाबरण्याची गरज नसल्याचेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणारी यादी ही केवळ प्रारूप (Draft) यादी असून ती अंतिम यादी नाही. त्यामुळे एखाद्या मतदाराचे नाव वगळले गेले असल्यास त्याला पुन्हा नाव समाविष्ट करण्याची संपूर्ण संधी उपलब्ध असणार आहे. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येतील. २०२५ च्या मतदार यादीत नाव असतानाही २०२६ च्या प्रारूप यादीत नाव दिसत नसेल, तर महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांच्या एसआयआर पोर्टलवर उपलब्ध ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) तपासणी सुविधेद्वारे संबंधित माहिती तपासता येईल. नवीन मतदार नोंदणीसाठी किंवा वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ (Form 6) आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्रासह भरावा लागेल. यासाठी आधार कार्ड, जन्मतारीखेचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, २०२५ च्या मतदार यादीतील नोंदीचा स्क्रीनशॉट किंवा प्रत आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल. दावा किंवा हरकत दाखल झाल्यानंतर निवडणूक विभागाकडून त्यावर सुनावणी घेण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे कोणत्याही मतदाराने नाव नसल्यामुळे निराश न होता, निर्धारित कालावधीत आवश्यक अर्ज करून आपले मतदानाचे अधिकार सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.






