मुंबई : वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना सुरू असतानाच आता सैन्य आणि पोलिस दलामध्ये भरती करतो असे सांगून फसविण्यात आले आहे. मुलुंडमध्ये दोन तरुणांना कोणत्याही परीक्षेविना भरती करतो, असे सांगून त्यांच्याकडून वीस लाख रुपये घेण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न मिळाल्याने या तरुणांनी फसविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे. मुलुंड येथे वास्तव्यास असलेला सोमेंद्र (बदललेले नाव) हा पार्ट टाइम नोकरी करतानाच केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. पार्ट टाइम नोकरी करीत असलेल्या कंपनीच्या कामानिमित्त सोमेंद्र लोणावळा येथे गेला असता त्याची ओळख पुर्नचंद्र सेनापती या व्यक्तीसोबत झाली. सेनापती याने आपण सैन्यातून सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले. त्याच्यासोबत बोलत असताना सोमेंद्र याने सैन्यात भरती होण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यासाठी काय तयारी करावी लागेल अशी विचारणा त्याने सेनापती याच्याकडे केली. त्यावर सैन्यात आपल्या अनेक ओळखी असून कोणत्याही परीक्षेविना भरती करण्यात येईल, असे सेनापती म्हणाला. सुरुवातीला सोमेंद्र याचा यावर विश्वास बसत नव्हता त्यामुळे त्याने फारसा रस दाखवला नाही. मात्र सेनापती याने पाठपुरावा सुरूच ठेवला आणि सोमेंद्र याला तयार केले.
सोमेंद्र याने परीक्षेविना भरतीची माहिती त्याच्या एका मित्राला दिली. तोही यासाठी तयार झाला. दोघांनी शैक्षणिक कागदपत्रांसोबत काही रक्कम सेनापती याला दिली. त्यानंतर थोडे थोडे करून दोघांकडून त्याने वीस लाख पंधरा हजार रुपये घेतले. इतकी रक्कम दिल्यानंतर सोमेंद्र आणि त्याच्या मित्राने सेनापतीकडे पाठपुरावा केला. सैन्यात भरती होण्यासाठी वयाची अट पूर्ण होत नसल्याचे सांगत सेनापती याने दोघांना महाराष्ट्र पोलिस दलामध्ये भरती करतो, असे सांगितले. मात्र अनेक दिवसांनंतरही नोकरीबाबत काहीच होत नसल्याचे पाहून या तरुणांनी सेनापती याच्याविरुद्ध मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.