पुणे : पुणे विमानतळावर अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अंतर्वस्त्रातून सोने लपवून तस्करी करणाऱ्या दुबईहून आलेल्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून ७३ लाखांचे सोने जप्त करण्यात आलं आहे. पुणे विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने शंका आली. त्यानंतर प्रवाशाची कसून तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे सोने सापडले. कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. सोन्याच्या तस्करी प्रकरणी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने अधिकाऱ्यांना शंका आली. त्यानंतर कस्टमच्या पथकाने या प्रवाशाची तपासणी केली.
या प्रवाशाच्या अंतर्वस्त्रात प्लास्टिकच्या पिशवीत सोन्याची भुकटी लपवल्याचे आढळून आले. या प्रवाशाकडून १ हजार ३५६ ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत ७३ लाख २८ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी प्रवाशाविरुद्ध कस्टम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.