अयोध्या : ‘आज हमारे राम आ गये’ असे उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनोगतास सुरुवात केली. निमित्त होतं अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करुन रामलल्ला यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेक रामभक्तांना घरबसल्या मिळालं. आज आपले राम आलेत, वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर, त्याग आणि तपश्चर्येनंतर प्रभू राम आले, असे उद्गार मोदींनी काढले. श्रीराम भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात रामलल्लांची विधीवत पूजा करण्यात आली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.
“आज हमारे राम आ गये, वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर, त्याग आणि तपश्चर्येनंतर प्रभू राम आले. माझा कंठ दाटून आला आहे, शरीरात स्पंदनं निर्माण झाली आहेत, आणि मन त्या क्षणात लीन झालं आहे. आपले रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, दिव्य मंदिरात राहणार आहेत. माझा पक्का विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे, विश्वाच्या कानाकोपऱ्यात रामभक्तांना याची अनुभूती आली असेल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “हे क्षण अलौकिक आहेत, पवित्र आहेत, हे वातावरण, ही ऊर्जा… प्रभू श्रीरामांचा आपल्यावर आशीर्वाद आहे. पण २२ जानेवारी २०२४ चा सूर्य अद्भूत तेज घेऊन आला आहे. भूमिपूजनापासून सर्वांना उमंग जाणवत होता, अन् उत्साह वाढतच चालला होता. २२ जानेवारी २०२४ हा नव्या कालचक्राचा उगम आहे. आपल्याकडून कुठलीतरी कमतरता राहिली असेल, म्हणून इतकी वर्ष आपण राम मंदिराचा निर्माण करु शकलो नाही, परंतु आता श्रीरामाने आपल्याला माफ केलं असेल” या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. अयोध्यानगरीत भक्तांचा महासागर उसळला होता. मात्र फक्त अयोध्याच नव्हे, तर अवघा देश ‘राम’मय झाला आहे. महाराष्ट्रातही राम भक्तांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा केला.