रत्नागिरी : कोकणात मान्सूनचे आगमन जवळ येत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वे महामंडळ (केआरसीएल)ने विशेष खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अतिवृष्टी, दरड कोसळणे आणि रेल्वे मार्गांवरील संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी संवेदनशील रेल्वे मार्गांवर रात्रगस्त वाढविण्यात आली असून धोकादायक ठिकाणी २४ तास वॉचमन तैनात करण्यात आले आहेत. मान्सून काळात रेल्वे वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती केआरसीएलकडून देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर केआरसीएलच्या सुरक्षा विभागातर्फे ३ जून रोजी रत्नागिरी येथे ‘मान्सून पेट्रोलिंग’ विषयावर सुरक्षा परिसंवाद आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या प्रणालीअंतर्गत प्रत्येक गस्त कर्मचाऱ्याला सुमारे पाच किलोमीटरचा रेल्वे मार्ग तपासणीसाठी सोपविला जातो. गस्तीदरम्यान शेजारच्या पथकाशी ‘पेट्रोल डायरी’ची देवाणघेवाण करून संबंधित मार्गाची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते. या प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही परिसंवादात सादर करण्यात आले. मान्सून काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपाययोजना करता याव्यात आणि रेल्वे अपघातांचा धोका कमी व्हावा, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे.






