मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या काळा घोडा परिसराला सुशोभीकरणाच्या माध्यमातून नवे रूप प्राप्त झाले असून, या परिसरातील रस्त्यांचे अत्यंत आकर्षक आणि वारशाशी सुसंगत असे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. या कामांमधून तत्कालीन वास्तुकलेची ओळख, परिसराचा ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक नागरी सुविधांचा सुंदर संगम साधण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काळा घोडा प्लाझा, बी. भरूचा मार्ग येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ‘काळा घोडा आर्ट एव्हेन्यू’ सौंदर्यीकरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी ही व्यवस्था नागरिकांसाठी एक समृद्ध ‘हेरिटेज वॉक’ म्हणून विकसित करण्यात आल्याचे नमूद केले. परिसरातील पादचारी मार्ग, सार्वजनिक जागा आणि प्रत्येक ठिकाणी कलात्मक स्पर्श देण्यात आल्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना वेगळाच अनुभव मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, ही सुंदर व्यवस्था भविष्यातही त्याच दर्जात टिकून राहण्यासाठी येथे येणारे नागरिक, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिक यांनी परिसराची स्वच्छता, शिस्त आणि सौंदर्य जपण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, मनपा विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, सभागृह नेते गणेश खणकर, नगरसेवक हर्षिता नार्वेकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर हा युनेस्कोच्या ‘व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको आसम्बल ऑफ मुंबई’ या जागतिक वारसा स्थळालगत असल्यामुळे या भागाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपत नागरिकांना दर्जेदार ‘हेरिटेज वॉक’चा अनुभव मिळावा, या उद्देशाने परिसरातील पाच प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामध्ये साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट तसेच बी. भरूचा मार्ग यांचा समावेश आहे. या परिसरात संग्रहालये, कला दालने आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू असल्यामुळे काळा घोडा हे मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. दरवर्षी आयोजित होणारा काळा घोडा कला महोत्सवही या परिसराची ओळख अधिक दृढ करतो. सुशोभीकरणाच्या कामांतर्गत बी. भरूचा मार्गावरील चौकात आकर्षक ‘प्लाझा’ विकसित करण्यात आला असून, त्यासाठी करडा आणि काळा ग्रॅनाईट तसेच बेसॉल्ट फरशीचा वापर करण्यात आला आहे. या प्लाझामध्ये टेबल-खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांना या परिसरातील ऐतिहासिक वातावरणाचा तसेच स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आनंद निवांतपणे घेता येणार आहे. याशिवाय, आकर्षक स्ट्रीट आर्ट भित्तिचित्रे, सुबक सार्वजनिक बसण्याच्या जागा आणि अधिक पादचारी-स्नेही रस्त्यांची निर्मिती करून परिसर अधिक सुरक्षित, सुंदर आणि पर्यटकांसाठी अनुकूल बनविण्यात आला आहे. कला, वारसा आणि आधुनिक नागरी सुविधांचा समतोल साधणारा हा प्रकल्प मुंबईच्या सांस्कृतिक पर्यटनाला नवी चालना देणारा ठरेल, तसेच नागरिक आणि देश-विदेशातील पर्यटकांसाठी काळा घोडा परिसर अधिक आकर्षक आणि अनुभवसमृद्ध ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.






