वृत्तसंस्था : नेपाळ सरकारने सुमारे १० वर्षांनंतर एक ऐतिहासिक निर्णय घेत भारतीय चलनावरील निर्बंध शिथिल केले आहेत, ज्यामुळे आता तिथल्या बाजारपेठेत २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा पुन्हा चलनात येणार आहेत. कॅबिनेटने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, कोणताही भारतीय किंवा नेपाळी नागरिक आपल्याकडे जास्तीत जास्त २५००० रुपयांपर्यंतच्या मोठ्या भारतीय नोटा बाळगू शकतो. ही मर्यादा ओलांडल्यास मात्र कारवाई होऊ शकते, परंतु ठराविक मर्यादेत पैसे ठेवणे आता पूर्णपणे कायदेशीर आहे. भारत आणि नेपाळ दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो पर्यटक, कामगार आणि व्यापाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने विदेशी चलन व्यवस्थापन नियमावलीत केलेल्या बदलांशी सुसंगत राहण्यासाठी नेपाळने हे जुने प्रतिबंध हटवले आहेत. सन २०१६ मधील नोटाबंदीनंतर नेपाळमध्ये १०० रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटांवर कडक बंदी घालण्यात आली होती, ज्याचा मोठा फटका भारतात काम करणाऱ्या नेपाळी मजुरांना बसत होता. त्यांना आपली कमाई १०० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या नोटांच्या स्वरूपात घरी न्यावी लागत असे. ज्यामुळे मोठी रक्कम असल्यास ती १०० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या नोटांच्या स्वरुपात बाळगणे जोखमीचे होते. चोरी होण्याचा किंवा पैसे गहाळ होण्याचा धोका जास्त असायचा. अनेक भारतीय पर्यटक देखील नियमांच्या माहितीअभावी अनवधानाने मोठ्या नोटा सोबत ठेवायचे आणि त्यांना दंड किंवा कायदेशीर कचाट्यात अडकावे लागत असे. मात्र, आता या समस्या सुटणार आहेत. मोठ्या रकमेच्या नोटांना परवानगी मिळाल्यामुळे नेपाळमधील हॉटेल, कॅसिनो आणि सीमावर्ती भागातील बाजारपेठांमधील उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतीय पर्यटक पैसे खर्च करताना मर्यादित चलनाच्या उपलब्धतेमुळे हात आखडता घेत होते, ज्याचा थेट परिणाम नेपाळच्या पर्यटन अर्थव्यवस्थेवर होत होता. आता २०० आणि ५०० च्या नोटा सहज स्वीकारल्या जाणार असल्याने विनिमयाची प्रक्रिया सोपी होईल.







