सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आता नव्या बसगाड्या घेत आहे. तरीपण, नऊ हजारांवर बस जुन्याच आहेत. प्रवासी बसमधून गावी जात असताना अनेकदा वाटेतच बस बंद पडतात. अशावेळी मागून येणारी बस शिवाई किंवा जास्त तिकीट दराची असेल, तरी तेवढ्याच तिकीटात प्रवाशांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोचविले जाईल, असे सोलापूरचे विभागप्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सारख्या बसगाड्या बंद पडलेल्या पहायला मिळतात. त्याठिकाणी प्रवासी रस्त्यावरच दुसऱ्या बसची वाट पहात बसलेले दिसतात. त्याच मार्गावरून येणाऱ्या दुसऱ्या बसला थांबवून त्यातून प्रवासी पुढे पाठविले जातात. दरम्यान, प्रवाशाने साध्या बसचे तिकीट काढले असेल आणि ती बस वाटेत बंद पडली, तरीदेखील त्या प्रवाशांना मागून येणाऱ्या आरमदायी, विनाथांबा बसमधून देखील तेवढ्याच तिकीटात पुढे प्रवास करता येईल. परंतु, त्या मार्गावर दुसरी बस नाही किंवा अर्धा-एक तासाने येणार आहे, अशावेळी प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना तिकीटाचे पैसे परत देखील देण्याची तरतूद आहे. पण, प्रवासी ज्या स्थानकावरून बसला आणि ज्या ठिकाणी गाडी बंद पडली, तिथपर्यंतचे प्रवासभाडे कपात करुन घेतले जाते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, त्यांना वेळेत पुढचा प्रवास करता यावा म्हणून त्यांना दुसऱ्या बसमधून लगेचच पाठविले जाते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवासी एसटी बसमधून गावी जात असताना वाटेतच एसटी बस बंद पडल्यास त्यांना मागून येणाऱ्या दुसऱ्या बसमधून पाठविले जाते. पण, काहीवेळा प्रवासी दुसऱ्या पर्यायी वाहनाने जाणार असल्याचे सांगून तिकीटाचे पैसे परत मागतात. अशावेळी जेवढा प्रवास झाला, तेवढी रक्कम कपात करून संबंधित प्रवाशाला तिकीटाचे बाकीचे पैसे परत दिले जातात.







