नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनारपट्टीजवळील ‘सेतेबेलो’ या व्यापारी जहाजावरील हल्ल्यानंतर भारताने अमेरिकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर २४ भारतीय खलाशी कार्यरत होते. घटनेची गंभीर दखल घेत भारताने नवी दिल्लीत अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना समन्स बजावून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या घटनेबद्दल भारताची नाराजी स्पष्ट केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर २४ पैकी २१ भारतीय खलाशांची सुखरूप सुटका करण्यात आली असून तीन भारतीय खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन आणि ओमानच्या नौदलाच्या संपर्कात असून बेपत्ता खलाशांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम राबवली जात आहे. भारताने या घटनेचा निषेध करत व्यापारी जहाजांवरील हल्ले थांबविण्याची मागणी केली आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जहाजावरील कारवाईची पुष्टी केली असून जहाजाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. त्यानुसार जहाजाच्या इंजिन रूमला लक्ष्य करून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यामुळे इंजिन रूममध्ये भीषण आग लागली. ओमानमधील सोहार बंदरापासून सुमारे २० सागरी मैल अंतरावर ही घटना घडली. दरम्यान, सागरी सुरक्षा क्षेत्रातील अहवालांनुसार हा प्रकार इराणशी संबंधित जहाजांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर घडल्याचे मानले जात आहे. भारताने या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सागरी सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा इशारा दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित पक्षांना तणाव कमी करण्याचे, राजनैतिक चर्चेला प्राधान्य देण्याचे आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील सुरक्षितता व मुक्त नौवहन कायम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद करत शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्यावर भर दिला आहे.







