पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने निगडी येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने केलेल्या तपासणीत एका कारमध्ये २९ लाख ५० हजाराची रोकड आढळून आली. ही रक्कम पुढील तपासासाठी उपायुक्त प्राप्तीकर मावळ विभाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने दैंनदिन अहवाल मावळ लोकसभेचे निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात येत असून निगडी व दापोडी या ठिकाणी स्थापित स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात स्थिर सर्वेक्षण पथकाने एका कारची तपासणी केली. कारमध्ये २९ लाख ५० हजाराची रोकड आढळून आली.
अधिक चौकशी केली असता ही रक्कम दिपक रविंद्र वाणी यांची असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईचे चित्रीकरण व जप्ती पंचनामा तयार करण्यात आला असून संबंधितास जप्त केलेल्या रकमेची पोहोच देण्यात आली आहे. जप्त रक्कम व अनुषंगिक कागदपत्रे उपायुक्त प्राप्तीकर मावळ विभाग यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. या कारवाईची आयोगाकडील आज्ञावलीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. सविस्तर अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला असून पुढील तपास चालु आहे.