मुंबई : ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधाल लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, सूड भावनेने आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (५५) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम ३८५, १४३, १४७, ३२३, १२० ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार जैन यांनी ठक्करला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. त्यावेळी जाधव त्यांचे सहकारी, अंगरक्षक व सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याबाबत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेने आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीने दूरध्वनी करून मला व माझ्या पत्नीला डांबून ठेवले आहे, असे सांगितले होते. मी पोलिसांसह तेथे गेलो होतो, असे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहक व व्यापारी यांच्यातील वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.