मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रचारात बदलत्या तंत्रज्ञानानुसार डिजिटलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची स्मार्ट पद्धत अवलंबली जात आहे. सध्या जिल्ह्यात उमेदवारांकडून फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यु-ट्युब, ट्विटरच्या माध्यमातून हायटेक प्रचाराची यंत्रणा प्रभावीपणे राबविली जात आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी निवडणूकांचा प्रचार करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारापर्यंत प्रत्यक्ष पोचण्याव्यतिरिक्त इतर पर्याय नव्हता. त्यावेळी जाहीर सभा, घोंगडी बैठकांवर आणि नात्यागोत्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा उमेदवारांचा आटापिटा चाललेला असायचा. संपर्क यंत्रणेच्या अभावी कानाकोपऱ्यात गावोगावी जाताना सर्वांचीच दमछाक व्हायची. त्या काळात बैलगाडी, दुचाकी, टेम्पो, जीप, ट्रक अशा वाहनांमधून गावोगांवी जात कर्ण्यांच्या स्पीकरवरून घोषणा देत, गाणी म्हणत आणि पथनाट्याच्या माध्यमातून प्रचार केला जात होता. गावोगावी घरांच्या भिंतीवर उमेदवाराचे नाव आणि चिन्ह रंगविले जायचे. बिल्ले, झेंडे अशा प्रकारच्या प्रचार साहित्यांचा घराघरांत वापर केला जात होता. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर निवडणूक प्रचारासाठी वाढला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरून आरोप, प्रत्यारोप गाजत आहेत. वेगवेगळ्या आकर्षक सजावटींचे बॅनर, व्हिडिओ या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न चालू आहे. एकंदर नेटकऱ्यांच्या माध्यमातून आधुनिक स्वरूपाचा स्मार्ट प्रचार उमदेवारांकडून सुरू आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यु-ट्युब, ट्विटर या ऑनलाइन यंत्रणेमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेली घटना काही मिनिटात लोकांना कळू लागली. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रचाराचे प्रभावी साधन ठरले आहे. पक्षांची, उमेदवारांच्या प्रगतीची, घेतलेल्या निर्णयाची सचित्र माहिती देणाऱ्या डिजिटल स्क्रीन गावोगावी धावत आहे. निरनिराळी स्लोगन वापरून भविष्याचे व्हीजन स्क्रीनवर दाखवून मतदारांना प्रभावित केले जात आहे. पक्षांतील ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांच्या सभांची भाषणे तळागाळात पोचविण्यासाठी आणि ती कधीही ऐकण्यासाठी यु-ट्युब हे प्रभावी माध्यम ठरले आहे.त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर इंटरनेटवर यु-ट्युबला खूप पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील स्थानिक न्यूज चॅनलचीही या माध्यमातून मोठी चलती होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप अतिशय प्रभावी माध्यम ठरले आहे. व्हॉट्स अपद्वारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पक्षाची, उमेदवारांची माहिती, व्हीजन, विविध भाषणांचे ऑडिओ, व्हिडिओ, पक्षांची विकाससूत्री आदि माहिती पाठविली जात आहे.