मुंबई : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या सायबर मदतवाहिनीच्या (हेल्पलाइन) माध्यमातून आतापर्यंत फसवणूकीतील ५० कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे. सायबर पोलिसांच्या १९३० या मदत वाहिनीवर आतापर्यंत सुमारे सव्वा दोन लाख दूरध्वनी आले आहेत. त्यानंतर फसवणुकीची रक्कम गोठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई शहरातील नागरिकांची सायबर गुन्हयामध्ये फसवणूक झालेली रक्कम संबधित बँक खात्यामध्ये गोठविण्याकरिता मुंबई गुन्हे शाखा अंतर्गत १९३० हेल्पलाइन १७ मे २०२२ मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. याद्वारे सायबर गुन्हयात हस्तांतरीत झालेली रक्कम तात्काळ गोठवण्याचे काम करण्यात येते. त्या अंतर्गत आतापर्यंत सुमारे ५० कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. त्यात ईमेल फिशिंग, ऑनलाइन जॉब फ्रॉड, क्लासिफाईड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, वधू-वर सूचन संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाज माध्यांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक, सेक्सटॉर्शनसारख्या कुठल्याही फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये फसवणूक करण्यात आलेली ही रक्कम आहे.
रस्ते अपघातातील जखमीला तात्काळ उपचार मिळून जीव वाचला तर त्या काळाला गोल्डन अवर्स म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पैसे वाचवणे शक्य होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल झाल्यानंतर आठवड्याचा कालावधी लागायचा. त्याचा फायदा घेत आरोपी खात्यातील रक्कम काढायचे. पोलिसांच्या हेल्पलाइनवर दूरध्वनी केल्यास तात्काळ रक्कम गोठवणे शक्य आहे. त्यासाठी १९३० या क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक आहे अथवा तात्काळ ऑनालाइन तक्रार करणे आवश्यक आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार केल्यास फसवणुकीचे पैसे वाचवणे शक्य होते. २४ तास सुरू असलेल्या या हेल्पलाइनसाठी दोन पोलीस उपनिरीक्षक व ४८ अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.