नाशिक : शहरात ड्रग्स बनवणारी कंपनी मागील काळात उद्ध्वस्त करण्यात आली होती. कोटींचा कच्चामाल देखील पोलिसांनी यावेळी हस्तगत केला होता. नाशिक ड्रग्स प्रकरण राज्यभर गाजले असताना यातच आता नाशिकच्या नाशिक रोड परिसरातील गोसालवाडीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला आणि बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर नाशिक पोलिसांनी छापा टाकला आहे. यात सहा संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांकडून तब्बल ९ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोसावीवाडी येथील मंन्सुरी चाळीमध्ये एका घरात मागील चार महिन्यांपासून बनावट गुटखा तयार करण्याची फॅक्टरी सुरू होती, असे नाशिकरोड पोलिसांच्या तपास करत असताना उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकरोड भागात एमडी ड्रग्जनिर्मितीचा कारखाना व गोदामाचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. गुटखा फॅक्टरी चालविणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
गोसावीवाडीला अगदी जवळ असलेल्या नाशिकरोड रेल्वेस्टेशन, बसस्थानक हा बनावट गुटखा विक्रीचा मूळ अड्डा होता. टोळीकडून चालत्या रेल्वेमध्येसुद्धा गुटख्याच्या पुड्यांची चोरी छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती. रेल्वे गाड्यांमधून मोठ्या संख्येने परप्रांतीय प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्याचाच फायदा घेत ही टोळी त्यांना बनावट गुटखा विक्री करून आरोग्य धोक्यात टाकत होती, असे पोलिसांनी सांगितले. रेल्वेमध्ये गुटखा विक्री करणारी दुसरी टोळी या भागात कार्यरत आहे का? याचाही तपास पोलीस करत आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक रोड परिसरात बनावट गुटखा बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत बनावट गुटखा बनवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुटखा बनवणारी टोळी जेरबंद झाली असली तरी देखील शहरात अजून कुठे बनावट गुटखा बनवला जातो या संदर्भात माहिती पोलीस घेत आहेत. मात्र नाशिक शहरात अवैध धंदे सुरु असून नाशिकचे कनेक्शन मोठ्या शहरात देखील आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहे.