मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मोठं यश मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रॅकेट डीआरआयने उद्धवस्त केलं असून इथियोपीयामधून भारतात तस्करी करण्यात येत असलेलं १०० कोटींचं कोकेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आलं आहे. या कारवाईत डीआरआयने ९.८२९ किलो कोकेन जप्त केलं आहे. मुंबईमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. डीआरआयने जप्त केलेल्या कोकेनची अंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत १०० कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणामध्ये डीआरआयने २ महिला प्रवाशांना ताब्यात घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला इंडोनेशियाची आणि दुसरी थायलंडची आहे. या दोघीही इथियोपीयामधून अदिस अबाबमधून भारतात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. डीआरआयने केलेल्या तपासामध्ये सदर अमली पदार्थ हे नवी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये वितरित करण्याचा प्लॅन होता. मुंबईमध्ये तैनात करण्यात आलेल्या डीआरआयच्या टीमला मोठ्याप्रमाणात अमली पदार्थांची मुंबईतून दिल्लीला तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एका टीमला दिल्लीमध्ये अलर्ट करण्यात आलं. एकीकडे मुंबईमध्ये या दोन महिलांविरोधात कारवाई करताना या रॅकेटमधील दिल्लीतील सूत्रधार ताब्यात घेण्यासाठी ही टीम पाठवण्यात आली.
पोलिसांनी मुंबईत पकडलेल्या २ महिला आणि दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दोघांविरोधात एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय तस्करांच्या हाती हे अमली पदार्थ पडण्याआधीच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केल्याने हे यश मिळालं. सदर गट हा इथियोपीया आणि भारताबरोबरच श्रीलंकेमध्येही अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये अटक करण्यात आलेल्या महिला या रिकाम्या दिसणाऱ्या बॅगमधून अमली पदार्थांची तस्करी करत होत्या. बॅगच्या आतमध्ये कळणार नाही अशापद्धतीने कप्पा तयार करुन त्याहून हे ९ किलोहून अधिक वजनाचं कोकेन नेलं जात होतं. अधिकाऱ्यांनी ही बॅग कशाप्रकारे तोडली आणि त्यातून अमली पदार्थ बाहेर काढले याचा व्हिडीओ समोर आला आहे. भारतामधून चालणारं किंवा देशांतर्गत अमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं उद्धवस्त करण्याच्या उद्देशाने डीआरआय काम करते. देशात परदेशामधून कोणतेही अमली पदार्थ येऊ नयेत तसेच आले तर ते देशात प्रवेश करण्याआधीच विमानतळ किंवा बंदरांवरच रोखले जावेत असा डीआरआयचा प्रयत्न असतो, असं डीआरआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.