मुंबई : मार्च महिना आता सरत आला आहे. एप्रिल महिना सुरू होण्याच्या आधीच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागान उकाडा वाढला आहे. मुंबईतही उन्हाचा पारा चढला आहे. गुरुवार पर्यंत मुंबईत उन्हाचा ताप आणखी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३८ अंशापर्यंत उन्हाचा पारा चढू शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटलं आहे. मुंबईत मंगळवारी कमाल तापमान अवघ्या २४ तासांत २.२ अंशानी वाढले होते. कोकणातील दमट आणि उष्ण हवामानामुळं आधिक उकाडा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत कुलाबा येथे ३२.२ तर, सांताक्रुझ येथे ३४.२ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद मंगळवारी झाली होती. सोमवारपेक्षा मंगळवारी कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे.
कोकण विभागात येत्या दोन ते तीन दिवसांत काही प्रमाणात दमट हवा असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात समुद्रावरुन येणारे वारे उशिराने वाहतात. त्यामुळं हवेत दीर्घकाळ उष्णता राहते. २० मार्च ते २२ मार्च या काळात कोकण विभागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर, राज्यातील इतर भागात कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढू शकेल. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होऊ शकेल. ही अवस्था एप्रिल ते मे पर्यंत राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटांची शक्यताही मराठवाडा आणि विदर्भात वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता इतर राज्यातील भागांपेक्षा अधिक असू शकते. तर, कोकणात त्या तुलनेने उष्णतेची तीव्रता कमी असू शकते. एकीकडे उष्णतेचा पारा चढत असताना काही ठिकाणी अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मार्च ते मे पर्यंत अवकाळी पाऊस होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अल निनोच्या प्रभावामुळं ही परिस्थिती उद्भवू शकते. दरम्यान, हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी विदर्भात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यावरही पावसाळी ढगांचं सावट असेल.