मुंबई : मुंबईत आणि उपनगरात रात्रभर मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन, दादर यांसारख्या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यासोबतच मुंबई लोकल उशिराने सुरु आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवेसह सर्व वाहतूक संथ गतीने सुरू आहेत. मुसळधार पाऊसामुळे, जलमय रस्त्यांमुळे आणि लोकल उशिरा धावत असल्याने कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर दक्षिण मुंबईत अधिक पाहायला मिळत आहे. नरिमन पॉइंटवर ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. पावसाची संततधार आणि वाऱ्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून मार्ग काढतांना बंद पडत आहे. ज्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. फोर्ट परिसर हा सर्वाधिक पावसाचा अनुभवलेला भाग असून तिथं ७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ बांद्रा ६२ मिमी, मलबार हिल ६० मिमी, लोअर परळ ५८ मिमी आणि हाजी अली ५७ मिमी पावसासह पुढे आहेत.







