मुंबई : प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले असून, लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये आजपासून ‘केंद्रित तिकीट तपासणी मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत.
मुंबई विभागाचे विशेष तिकीट तपासणी पथक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांना सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी सर्व प्रथम श्रेणी डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने व संपूर्ण प्रवासादरम्यान तैनात करण्यात येणार आहे. हे पथक प्रत्येक लोकलच्या सर्व डब्यांतील प्रवाशांच्या तिकिटांची सखोल तपासणी करणार आहेत. विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रवासादरम्यान दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दंड भरण्यास नकार देणाऱ्या प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरवून तेथील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात येईल व गरज भासल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.







