मुंबई : राज्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून महाराष्ट्राचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी आज, रविवार २८ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. या मोहिमेसाठी राज्यभरात ८९ हजार ४८९ लसीकरण केंद्रे, २६ हजार ५३० प्रवासी पथके, १३ हजार ५१८ फिरती पथके आणि ५८६ रात्रपाळी पथके कार्यरत राहणार आहेत. देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात पोलिओचा शेवटचा रुग्ण सप्टेंबर २०१० मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता, तर देशातील शेवटचा रुग्ण जानेवारी २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये नोंदविण्यात आला होता. त्यानंतर २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले. मात्र, शेजारील काही देशांमध्ये अद्यापही पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने या आजाराचा प्रसार होण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज राज्यभर ही मोहीम राबविण्यात येत असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सुमारे १ कोटी ३ लाख बालकांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत.
लसीकरण केंद्रावर येऊ न शकलेल्या बालकांसाठी शहरी भागात पुढील पाच दिवस आणि ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे. तसेच प्रवासात असलेल्या बालकांसाठी प्रवासी, फिरती आणि रात्रपाळीच्या विशेष पथकांमार्फतही मोहिमेच्या कालावधीत लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य लसीकरण कृती दलाची बैठक घेण्यात आली असून सर्व संबंधित शासकीय विभाग आणि विविध यंत्रणांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या समन्वयासाठी प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिकेसाठी राज्यस्तरीय समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा, तालुका आणि प्रभाग स्तरावरही समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य, जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावरील वैद्यकीय अधिकारी तसेच लसीकरण कर्मचाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व शहर लसीकरण कृती दलाच्या बैठका घेण्यात आल्या असून मोहिमेसाठी आवश्यक निधी, वित्तीय मार्गदर्शक सूचना तसेच पोलिओ प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा मान कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला आज जवळच्या लसीकरण केंद्रात नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.







