वूत्तसंस्था : महाराष्ट्राच्या पार्थ साळुंखेने ऐतिहासिक कामगिरी करताना युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदकाची कमाई केली. युवा जागतिक स्पर्धेतील रीकव्र्ह गटात सोनेरी यश संपादन करणारा पार्थ भारताचा पहिला पुरुष तिरंदाज ठरला आहे. तसेच भारताने युवा जागतिक तिरंदाजीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना एकूण ११ पदके पटकावली. साताऱ्याच्या पार्थने २१ वर्षांखालील पुरुषांच्या रीकव्र्ह विभागातील अंतिम लढतीत सातव्या मानांकित कोरियाच्या सॉन्ग इन्जुनचा ७-३ असा पराभव केला. १९ वर्षीय पार्थ सुरुवातीला पिछाडीवर होता. पहिला सेट २६-२६ असा बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सॉन्गने २५-२८ अशी बाजी मारताना एकूण लढतीत आघाडी मिळवली. मात्र, पार्थने दडपणाखाली संयम बाळगताना पुढील तीन सेट अनुक्रमे २८-२६, २९-२६, २८-२६ असे जिंकत सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याचप्रमाणे २१ वर्षांखालील महिलांच्या रिकर्व्ह विभागात भारताच्या भजन कौरने कांस्यपदक मिळवले. तिने चायनीज तैपेइच्या सु हसीन-यु हिला ७-१ (२८-२५, २७-२७, २९-२५, ३०-२६) असे सहज पराभूत केले.भारताने या स्पर्धेत सहा सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली. युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील ही भारताची सर्वाधिक पदके ठरली. मात्र, भारताला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोरियाने अग्रस्थान मिळवले.
पार्थची या स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने कोरियन तिरंदाजाचे वर्चस्व मोडून काढताना सुवर्णयश मिळवले. त्याने यापूर्वी जूनमध्ये सिंगापूर येथे झालेल्या आशिया चषकाच्या तिसऱ्या टप्प्यात रौप्यपदक मिळवले होते. तसेच गेल्या वर्षी या स्पर्धेच्या सुलेमानिया आणि शारजा येथील टप्प्यांत त्याने कांस्यपदके जिंकली होती. २०२१च्या युवा जागतिक स्पर्धेतील पुरुष सांघिक गटात सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. यंदाच्या स्पर्धेत मिश्र सांघिक गटात पार्थने रिद्धीसह कांस्यपदक मिळवले. युवा जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पार्थ साळुंखे हा भारताचा एकूण सहावा तिरंदाज आहे. यापूर्वी दीपिका कुमारी, कोमालिका बारी, पाल्टन हन्सदा, अदिती स्वामी आणि प्रियांश यांनी युवा जगज्जेतेपदाचा मान मिळवला होता.