मुंबई : कुरार परिसरातून दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी मुलांची चोरी करून अथवा गरीब पालकांकडून लहान मुले खरेदी करून विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. अटक आरोपींमध्ये एक नाशिकचा असून, त्याच्यामार्फत हैद्राबादमध्ये मुलांची विक्री करण्यात येत होती. हैदराबाद येथील आरोपीच्या मागावर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फुटपाथवरून दोन वर्षाची मुलगी गायब झाली. तिच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून कुरार पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली अमर जगदाळे, पंकज वानखेडे, संतोष खरडे, ज्ञानेश्वर जुन्न, रवींद्र मेदगे, ऐश्वर्या ऐताळ यांची पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकाकडे वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजद्वारे माग घेत असताना लहान मुलीला चोरट्यांनी दादर येथे सोडल्याचे दिसले. पोलिसांच्या पथकाने दादर येथे रेल्वे पोलिसांकडून या मुलीला ताब्यात घेतले.
मुलगी सुखरूप सापडल्यानंतर पोलिसांनी मालाड, मालवणी, गोवंडी येथील पाच आरोपींची धरपकड केली. इरफान खान, सलाउद्दीन सय्यद, आदिल खान, तौफिर सय्यद, रझा शेख अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे असून, त्यांच्या चौकशीमध्ये नाशिकच्या समाधान जगताप याचे नाव पुढे आले. पोलिसांच्या पथकाने नाशिक येथून समाधान याच्याही मुसक्या आवळल्या. समाधान हा हैद्राबाद येथील तरुणाच्या संपर्कात असून, त्याच्या माध्यमातून मुलांची विक्री करीत होता असे चौकशीतून समोर आले आहे. ही टोळी नवजात शिशु ते सहा महिने वयाच्या मुलांची खरेदी विक्री करते. मुले नसलेली दाम्पत्य मुलांना दत्तक घेतात मात्र त्यांना लहान मुले हवी असतात. त्यामुळे सहा महिन्यापर्यंतची अट ठेवण्यात आली होती. कुरार येथून पळविण्यात आलेली मुलगी दोन वर्षांपेक्षा मोठी असल्याने हा सौदा फिस्कटला आणि तिला दादर येथे सोडून चोरटयांनी पळ काढला.