मुंबई : शहरात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
पालकमंत्री श्री. लोढा यांनी आजवर प्रत्येक निर्णय प्रक्रियेत जनतेला सहभागी केले आहे. यावेळी ही सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ प्रतिनिधींच्या समस्या, कल्पना आणि सूचना पालकमंत्री श्री. लोढा यांनी नमूद करून घेतल्या व त्यानुसार तात्काळ अंमलबजावणीसाठी आदेश दिले. यावेळी बिगर व्यावसायिक नवरात्र मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यावर्षी नाममात्र अनामत रक्कम रु. १००/- आकारण्यात येणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला. नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव असून, पूर्वापार चालत आलेली ही भावना जपण्यासाठी पालकमंत्री श्री. लोढा यांनी एक अनोखी संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे. या संकल्पनेनुसार नवरात्री, रास दांडिया, गरबा आयोजनाच्यावेळी महापालिका व पोलीस प्रशासन यांच्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येईल. याकाळात पोलिसांचे निर्भया पथक संपूर्णपणे कार्यान्वित केले जाईल. महिला सुरक्षेची काळजी घेऊन उत्सव जल्लोषात साजरा व्हावा आणि आवश्यक तयारी कोणत्याही विलंबाशिवाय मंडळांना करता यावी यासाठी नवरात्रोत्सावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या गणेश उत्सवाच्या धर्तीवरच एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येतील. तसेच दसऱ्याला दुर्गा मूर्ती विसर्जन, गरबा विसर्जन यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाश झोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था गणेश विसर्जनाच्या धर्तीवर महापालिका प्रशासकीय विभागातर्फे उभारण्यात येईल. छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष अशी सर्व व्यवस्था प्रशासकीय विभागातर्फे करण्यात येईल. छटपूजेसाठी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तसेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे सूर्योदयावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्र उत्सव मंडळे दरवर्षी अधिकृतरित्या परवानगी घेतात तसेच मुंबई शहरात ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते.