पुणे : लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये देशात लोकप्रिय असणाऱ्या व्यक्तींचे पुतळे बनविण्यात येतात. त्यात अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांचे मेणाचे पुतळे बनवण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा देखील मेणाचा पुतळा बनविण्यात आला आहे. समाजासाठी जरांगे एवढे मोठे कार्य करत आहेत. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा अशी आस मनाशी बाळगून मावळ तालुक्यातील एका तरुणाने हा मेणाचा पुतळा बनवला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांचा पुणे जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. पुणे जिल्ह्यातील त्यांचा शेवटचा मुक्काम लोणावळा येथे होणार आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यात मावळ तालुक्यातील अशोक माळसकर या मराठा तरुणाने हा पुतळा बनवला आहे. अवघ्या तीन महिन्यात हा पुतळा साकारण्यात आला आहे. मनोज जारंगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील कार्ला या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून पाच फूट सात इंच इतकी या पुतळ्याची उंची आहे. मावळ तालुक्यातील अशोक माळसकर यांनी हा पुतळा उभारला आहे. जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी एवढं मोठं काम करत असून त्यात आपणही समाजासाठी करावे यासाठी हा पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे अशोक यांनी सांगितले आहे. अवघ्या तीन महिन्यात हा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.