पुणे : दिवसेंदिवस पुण्यात चोरीच्या घटनांचं प्रमाण वाढत आहे. अलीकडे उच्चशिक्षीत तरूणांमुळे आता चोरीच्या घटना देखील सफाईने होत आहेत. पुण्यात असाच एक उच्चशिक्षीत चोरटा गजाआड केलाय. पोलिसांनी त्याच्याकडून १७ मोबाईल देखील जप्त केले आहेत. मोबाईल चोरी करून बनावट बिलाच्या आधारे त्याची विक्री करणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. तो बीएस्सी पदवीधर आहे. त्याच्या ताब्यातून चोरीचे १७ मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिलीय. ओंकार विनोद बत्तुल (वय २२, रा. नाना पेठ) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. शिवाजीनगर येथील जुना तोफखाना भागातील फर्निचरच्या दुकानातून आरोपीने मोबाईल चोरी केला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीला शिवाजीनगर भागातून अटक केली. चौकशीनंतर त्याच्या ताब्यातून १७ मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी चोरलेल्या मोबाइलच्या बिलामध्ये फेरफार करून स्वत:चा मोबाईल असल्याचं भासवून विक्री करीत होता. बनावट बिलाच्या आधारे मोबाईल विक्री केल्याचं तपासात समोर आलंय. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मालकांचा शोध सुरू करण्यात आलाय. जे व्यापारी मोबाईल खरेदी-विक्री करतात, त्यांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना त्या मोबाईलच्या बिलाची पडताळणी करावी. त्यानंतरच कोणतेही व्यवहार करावेत, असं आवाहन पोलिसांनी केलंय.