नागपूर : नागपूरातील जेरील लॉनमध्ये आयोजित नवरात्री गरबा उत्सवाच्या प्रवेशद्वारावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे वराहदेवाची प्रतिमा लावण्यात आली आहे. येथे प्रवेश करणाऱ्या तरुण-तरुणींना कुंकू लावण्यात येत असून आधार कार्डाची तपासणी केल्यावरच प्रवेश दिला जात आहे. मुस्लिम बांधवांचा प्रवेश रोखण्यासाठी हा प्रताप असल्याने नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
जेरील लॉन येथे येशीव गरबा उत्सव समितीतर्फे गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या प्रवेशद्वारावरच विहिंप आणि बजरंगदलतर्फे वराहदेवाची मोठी प्रतिमा लावण्यात आली आहे. त्यास अभिवादन केल्यानंतरच तरुण-तरुणींसह नागरिकांना गरबा स्थळी प्रवेश देत होते. त्यापूर्वी कार्यकर्ते प्रत्येकाला कुंकवाचा टिळा लावून आधार कार्ड पाहिल्यानंतरच प्रवेश दिला जात होता. विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत गरबा मंडळांना वराहदेवाची प्रतिमा लावत प्रत्येकाला आधार कार्ड तपासून प्रवेश द्यावा असे मंडळांना सूचित केले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ परिसरात येणाऱ्या जेरील लॉन येथील नवरात्र उत्सवाच्या प्रवेशद्वारावर ही प्रतिमा लावून प्रत्येकाला कुंकू व आधार सक्तीने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.







