वसई : वसई विरार शहरात वीज चोरीच्या घटना वाढत आहे. महिन्याला सरासरी १ कोटी रुपायांची वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या मागील १० महिन्यात महावितरणाच्या भरारी पथकाने वीज चोरीची तब्बल अडीच हजार प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यातून साडेदहा कोटींची वीज चोरी झाल्याची माहिती महावितरणाने दिली. वसई विरार शहरात महावितरणाचे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, कृषी असे दहा लाखाहून अधिक वीज ग्राहक आहेत. वीज पुरवठा करताना काही वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊन वीज गळती होते. तर दुसरीकडे काही ठिकाणी छुप्या मार्गाने वीज चोरीचे प्रमाण ही वाढू लागले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वसाहती, चाळी तयार होत आहे. या भागात भागात अधिक आढळून येत आहेत. या वाढत्या वीज चोरीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह महावितरणला बसून लागला आहे. या वीज चोरीमुळे महावितरणचा आर्थिक तोटा होऊ लागला आहे. ही वीज चोरी मोठी समस्या बनली आहे.
अशा घटनांना रोखण्यासाठी महावितरण ने वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात भरारी पथके ही नियुक्त केली आहेत. यंदाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात अवघ्या दहा महिन्यातच या पथकांनी २ हजार ५४० ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघड केले आहेत. या वीज चोरांनी महावितरणची १० कोटी ७७ लाख ४८ हजारांची वीज चोरी केली असल्याचे महावितरणने सांगितले आहे. वीज मीटरच्या वाहिन्यांमध्ये फेरफार करणे, आकडे टाकणे, मुख्य वीज जोडणीच्या सर्व्हिस वाहिनीला टॅपिंग करणे अशा विविध प्रकारच्या मार्गाने वीज चोरी होऊ लागली आहे. तर काही जण रिमोट कंट्रोल द्वारे ही वीज चोऱ्या करू लागले असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
वर्ष – वीज चोरीची प्रकरणे – वीज चोरी
२०२४-२५ – २ हजार ५४० – १० कोटी ७७ लाख
२०२३-२४ – २ हजार ८३३ – १२ कोटी ४६ लाख
२०२२-२३ – २ हजार २६० – ९ कोटी ८१ लाख
शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने वीज चोरी केली जात आहे. अशा वीज चोरांवर प्रत्येक महिन्यात विविध भागात पथके नियुक्त करून कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत आम्ही अडीच हजार वीज चोरीच्या घटना उघड केल्या आहेत. – संजय खंडारे, अधीक्षक अभियंता महावितरण वसई.