मुंबई : दिवाळीच्या तोंडावर बेस्ट उपक्रम आणि अदानी विद्युत कंपनीच्या कामगारांनी बोनसच्या मागणीसाठी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात ऐन दिवाळीत वीज जाण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमाबरोबरच अदानी विद्युत कंपनीतील कामगारांनाही बोनसच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागत आहे.
दिवाळी अगदी तोंडावर आल्यामुळे सरकारी व खासगी कार्यालयांमध्येही बोनसची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईत वीज वितरण क्षेत्रात शहर भागात बेस्ट उपक्रमाचे जाळे आहे तर उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे वीज वितरण आहे. या दोन्ही कंपनीच्या कामगारांनी बोनससाठी आंदोलनाची तयारी केली आहे. मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन ही संघटना दोन्ही कंपन्यांमध्ये असून या संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमात ८.३३ टक्के आणि अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना २० टक्के दिवाळी बोनस द्या अन्यथा ऐन दिवाळीत आंदोलन अटळ आहे, असा इशारा मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला आहे. या वाढीव बोनसच्या मागणीवर बेस्ट, अदानी कंपनीतील कर्मचारी ठाम असून कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर चर्चा करण्यासाठी युनियनच्या व्यवस्थापकीय सभासदांची बुधवारी संध्याकाळी उशारापर्यंत बैठक सुरू होती.








