सिंधुदुर्ग : शिरोडा परिसरात वन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ७ कोटी रुपये किमतीची ‘व्हेल माशाची उलटी’ (अंबरग्रीस) जप्त केली आहे. या प्रकरणी बेकायदेशीर विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या चार स्थानिक संशयितांना मुद्देमालासह रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही व्यक्ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या मागणीत असलेला अंबरग्रीस गुप्तपणे विकण्याचा प्रयत्न करत होते. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. १६) सायंकाळी विशेष सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान संशयितांकडून मोठ्या प्रमाणात अंबरग्रीस जप्त करण्यात आले. अंबरग्रीस हा स्पर्म व्हेल या समुद्री सस्तन प्राण्याच्या पचनसंस्थेतून निर्माण होणारा दुर्मीळ पदार्थ असून त्याचा वापर प्रामुख्याने महागड्या परफ्यूम उद्योगात केला जातो. भारतात या पदार्थाच्या व्यापारावर बंदी असून, त्याची खरेदी-विक्री करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. वन विभागाकडून आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे.







