मुंबई : बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. डॉक्टर, अभियंता, आर्किटेक्ट यांसारख्या क्षेत्रात करिअर करण्याची अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने या निकालावर अवलंबून असतात. मात्र अपेक्षित गुण न मिळाल्यास अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली जातात. या तणावाचा त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र समुपदेशन सेवा सुरू केली आहे. शनिवारी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदा निकालात २.०९ टक्क्यांनी घट झाल्याने अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळत नाही, काही जण अनुत्तीर्ण होतात किंवा ठरावीक विषयांत कमी गुण मिळाल्याने इच्छित अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण होतात.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी राज्य मंडळाकडून दरवर्षी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यंदा मंडळाने १० समुपदेशकांची नियुक्ती केली असून, निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील सलग आठ दिवस हे समुपदेशक विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. ही सेवा दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत उपलब्ध असणार आहे. विद्यार्थी तसेच पालक कोणत्याही उपलब्ध क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या, शंका किंवा तणावाविषयी चर्चा करू शकतात. ही समुपदेशन सेवा पूर्णपणे निशुल्क असून विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्यासोबतच योग्य मार्गदर्शन करण्याचे काम समुपदेशक करणार आहेत. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.







