मुंबई : राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावाच्या नोंदणी पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावामध्ये आईचे नाव समाविष्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरूपात नोंद केली जात होती. मात्र आता नवीन निर्णयानुसार विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर आईचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा क्रमाने नोंद करण्यात येणार आहे. हा निर्णय राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये तात्काळ प्रभावाने लागू केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईच्या नावालाही समान महत्त्व मिळणार आहे.
या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, हजेरीपत्रक, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला तसेच प्रवेश-निर्गम उताऱ्यासह सर्व अधिकृत नोंदींमध्ये विद्यार्थ्याच्या नावानंतर आईचे नाव नमूद केले जाणार आहे. यापूर्वी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकांमध्ये आई-वडिलांची नावे नमूद केली जात होती, मात्र त्यात आडनाव, विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव आणि नंतर आईचे नाव असा क्रम होता. राज्य सरकारने हा निर्णय महिलांच्या योगदानाचा सन्मान, लिंग समानतेला प्रोत्साहन आणि सामाजिक समतोल साधण्याच्या उद्देशाने घेतल्याचे सांगितले जात आहे. घटस्फोटित किंवा विभक्त राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत परिस्थितीनुसार योग्य नोंद ठेवली जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. यापूर्वी राज्य सरकारने चौथे महिला धोरण मंजूर केल्यानंतर अनेक मंत्र्यांनी आपल्या नावाच्या पाट्यांवर वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला होता.







