मुंबई : महापालिका निवडणूक निकाल जाहीर आले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. विजयाचा उन्माद नको असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. महाराष्ट्रात आपल्या पक्षाने महाविजय मिळवला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये महाविजय मिळवला आहे. आपण सगले रेकॉर्ड आपण मोडले आहेत. २९ पैकी २५ महापालिकांमध्ये आपली सत्ता येते आहे. अजूनही मतमोजणी सुरु आहे. पूर्ण बहुमत आपल्यालाच मिळणार आहे.
मुंबईच्या महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल यात शंका नाही. मोदींच्या आशीर्वादाने विकासाचा अजेंडा दिला आहे तो घेऊनच आपण जनतेत गेले होतो. त्याला जनतेने आशीर्वाद दिला आहे.” जे जनमत आलं आहे, त्यावरुन हे सांगतो आहे की लोकांना विकास हवा आहे. लोकांना प्रामाणिक कारभार हवा आहे. महाराष्ट्राचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दिला आहे. तसंच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींचंही मी वंदन करतो कारण त्यांचेही आशीर्वाद आपल्याला लाभले आहेत. ज्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढलो, त्या विकासाच्या अजेंड्याला लोकांनी प्रतिसाद दिला. आमचा अजेंडा विकासच असणार आहे. लोकांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्यासाठी आम्ही वाटचाल करणार आहोत. आमच्या विचारांच्या आत्मा हिंदुत्ववाद आहे. हिंदुत्ववादी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि विकास यांना वेगळं करता येणार नाही. आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाहीत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत. त्यामुळेच व्यापक जनसमर्थन आपल्याला मिळालं आहे. कार्यकर्त्यांना माझा संदेश हाच आहे की जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. जिंकल्यानंतर कुठलाही उन्माद नको असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.







