मुंबई : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, राज्यातील अपेक्षित प्रमाणात वाहनांवर एचएसआरपी बसविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने शासनाने वाहनधारकांना दिलासा देत आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली आहे. परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील केवळ सुमारे ५० टक्के जुन्या वाहनांवरच आतापर्यंत एचएसआरपी बसविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित वाहनधारकांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना दिलासा मिळणार असून, शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासही मदत होणार आहे.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, निर्धारित मुदतीपर्यंत एचएसआरपी बसवून न घेणाऱ्या किंवा त्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट न घेणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध १ जुलै २०२६ पासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनधारकांकडून मोटार वाहन कायदा आणि नियमांनुसार एक हजार रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात येईल. त्यामुळे वाहनधारकांनी विलंब न करता लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ transport.maharashtra.gov.in वर जाऊन ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाईन अपॉईंटमेंट निश्चित करावी. शासनाने दिलेल्या या मुदतवाढीचा लाभ घेऊन वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी नमूद केले.







