छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली असून, यंदा भक्तीबरोबरच ‘डिजिटल उपवास’ करण्याचे अनोखे आवाहन मंदिर विश्वस्त मंडळांकडून करण्यात आले आहे. आषाढी एकादशीला मोठ्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. मात्र, दर्शनावेळी मोबाईलवर फोटो, व्हिडिओ, रिल्स तयार करणे किंवा सोशल मीडियावर वेळ घालविण्यामुळे भक्तीमय वातावरणात व्यत्यय येत असल्याचे निरीक्षण मंदिर प्रशासनाने नोंदवले आहे. याच पार्श्वभूमीवर, ज्या प्रकारे भाविक एकादशीच्या दिवशी अन्नाचा उपवास करतात, त्याचप्रमाणे एक दिवस मोबाईल आणि सामाजिक माध्यमांपासून दूर राहून विठ्ठल नामस्मरणात तल्लीन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री गजानन मंदिर विश्वस्त मंडळासह शहरातील अनेक विठ्ठल मंदिरांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला असून, भाविकांनी शक्यतो मोबाईल घरी किंवा वाहनात ठेवून संपूर्ण दिवस भक्ती, भजन, कीर्तन आणि नामस्मरणात व्यतीत करावा, असेही सांगण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध मंदिरांमध्ये ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषात भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळपासून तसेच शनिवारी पहाटेपर्यंत विविध कलाकार आणि भाविक विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण करणार असून, मंदिर परिसरात रोषणाई, फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
शहरातील धावणी मोहल्ला (शहागंज), ज्योतीनगर, जयसिंगपुरा, पंढरपूर गाव, सुधाकरनगर यांसह सुमारे २० ते २५ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये ‘डिजिटल उपवास’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, दर्शनाच्या रांगेत मोबाईलचा वापर कमी झाल्यास भाविकांना शांततेत दर्शन घेता येईल, तसेच इतरांना होणारा त्रासही टाळता येईल. या उपक्रमाला भाविकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या युगात काही काळ मोबाईलपासून दूर राहून मन एकाग्र करून विठ्ठलाच्या भक्तीत रमल्यास आध्यात्मिक समाधान अधिक मिळेल, अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीच्या दिवशी बहुतांश मंदिरांचे दरवाजे पहाटे ५ वाजल्यापासून दर्शनासाठी खुले राहणार असून, महाआरतीनंतर रात्री उशिरापर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन शिस्तबद्ध दर्शनासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून, आवश्यक सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, फराळ, राजगिरा लाडू आदी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांनी मंदिर परिसरात स्वच्छता राखावी, दर्शनावेळी संयम बाळगावा आणि शक्यतो मोबाईलचा वापर टाळून विठ्ठल नामात तल्लीन व्हावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.






