पुणे : पुणे शहरातील झपाट्याने वाढणारी वाहनसंख्या आणि वाहतुकीचा विस्तार लक्षात घेता वाहन चालविण्याच्या परवान्यांसाठी नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत तब्बल ४ लाख ३९ हजार २५३ नागरिकांनी कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त केला आहे. या आकडेवारीमध्ये दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांच्या परवान्यांचा समावेश आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत सर्वाधिक परवाने चारचाकी वाहनांसाठी वितरित करण्यात आले. चारचाकी वाहनांसाठी २ लाख २९ हजार ५४३ नागरिकांनी परवाने मिळवले, तर दुचाकी वाहनांसाठी २ लाख २ हजार ९६० जणांनी लायसन्स काढले. याशिवाय इतर वाहन प्रकारांसाठी ६ हजार ७५० परवाने देण्यात आले आहेत. वाढत्या वाहनसंख्येमुळे नागरिकांमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि परवाना घेण्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चारचाकी वाहन चालकांची चाचणी कासारवाडी येथील ‘आयडीटीआर’ केंद्रावर घेतली जाते, तर दुचाकी आणि तीनचाकी वाहन चालकांची चाचणी आळंदी रस्त्यावरील फुलेनगर कार्यालयात पार पडते. वाहन चालविण्याच्या कौशल्याची आणि नियमांची तपासणी केल्यानंतरच कायमस्वरूपी परवाना दिला जातो. पुणे शहरात दररोज सुमारे एक हजार नवीन वाहनांची भर पडत असताना, वाहन परवाना काढणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, वाहन परवाना मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत असून आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत होत आहे. सर्वप्रथम शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) घेणे आवश्यक असते. त्यानंतर ३० दिवसांनंतर किंवा सहा महिन्यांच्या आत कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करता येतो. ऑनलाइन प्रणालीमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोयीची झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.







