मुंबई : देशभरात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्पडताळणी मोहिमेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, मुंबईत अशाच प्रकारची धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे. मानखुर्द येथे राहणाऱ्या बीआरसी रुग्णालयातील ७० वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची मतदार पडताळणीच्या नावाखाली तब्बल ६ लाख ७१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे पत्नीसह मानखुर्द येथे वास्तव्यास असून, २९ जुलै रोजी त्यांच्या मोबाईलवर मतदार यादी पडताळणीदरम्यान त्यांचे नाव आणि वडिलांच्या नावात विसंगती असल्याचे सांगणारा संदेश आला. तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन त्या संदेशात करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता, सायबर भामट्यांनी व्हॉट्सअॅपवरून एक लिंक पाठवून मतदार पडताळणीसाठी ऑनलाइन फॉर्म भरावा, असे सांगितले. सरकारी प्रक्रिया असल्याचा विश्वास निर्माण करून त्यांनी डॉक्टरांकडून आधार क्रमांक, मतदार ओळखपत्राची माहिती, बँक खात्याचा तपशील तसेच क्रेडिट कार्डची माहिती भरून घेतली. त्यानंतर पडताळणी पूर्ण करण्यासाठी केवळ पाच रुपयांचे शुल्क भरावे लागेल, असे सांगण्यात आले. डॉक्टरांनी ऑनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न केला; मात्र व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यामुळे त्यांना काहीसा संशय आला. मात्र, काही मिनिटांतच त्यांच्या बँक खात्यांमधून आणि संबंधित आर्थिक साधनांद्वारे विविध व्यवहार करून मोठी रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. अशा प्रकारे काही क्षणांतच त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाली.
घटना लक्षात येताच तक्रारदारांनी तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. तसेच त्यांना आलेल्या विविध संशयास्पद मोबाईल क्रमांकांवरील संदेश आणि संपर्कांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर फसवणुकीमागील आरोपींचा शोध सुरू केला असून, वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक, बनावट लिंक आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. मतदार पडताळणी, केवायसी अद्ययावत करणे, गॅस बिल, बँक खाते, सरकारी योजना किंवा इतर कोणत्याही शासकीय प्रक्रियेच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी संदेशांतील लिंकवर क्लिक करू नये. तसेच आधार क्रमांक, बँक खाते, एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. कोणत्याही शासकीय प्रक्रियेसाठी केवळ अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत अॅपच वापरावे. संशयास्पद व्यवहार किंवा फसवणुकीची शक्यता वाटताच तात्काळ बँकेशी संपर्क साधून राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सायबर गुन्हेगार सतत नवनवीन पद्धती वापरून नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याने प्रत्येकाने सतर्क राहणे आणि कोणतीही ऑनलाइन माहिती भरताना तिची सत्यता पडताळणे अत्यंत आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.






