पुणे : सीमाशुल्क विभागाने (कस्टम) वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेले सहा हजार किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. रांजणगाव येथील एका खासगी कंपनीच्या भट्टीत अमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली. कस्टमने कारवाई करून अमली पदार्थ तस्करीप्रकरणी १४ गुन्हे दाखल केले होते. या कारवाईत २३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सहा हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
कस्टमच्या पथकाने १५५२ किलो गांजा, २७९ किलो चरस, मेफेड्रोन, कोकेन असे अमली पदार्थ जप्त केले होते. जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. कस्टमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष यशोधन वनगे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हाॅयरो लिमिटेड कंपनीच्या भट्टीत जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. कस्टमच्या पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, अशी माहिती कस्टमचे आयुक्त यशोधन वनगे यांनी दिली.