ठाणे : लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली असून ठाणे आयुक्तालयाच्या परिसरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी सराईत गुंडांना टार्गेट करून गजाआड करण्याची कारवाई सुरू केले आहे. निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. निवडणुकीत उपद्रवी ठरणाऱ्या संभाव्य गुंडांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. पोलिस आयुक्तालयातील अशा उपद्रवी गुंडांची यादी पोलिस ठाण्यांकडून मागवण्यात येत आहेत. त्यासाठी ठाणे आयुक्तालयातील गुन्हे शाखेत एमओबीचे एक स्पेशल पथक नियुक्त केले आहे. उपद्रवी आणि समाजकंटक गुंडांना निवडणूक काळात हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक काळात स्थानिक उपद्रवी गुंडाकडून होणाऱ्या अमली पदार्थ आणि दारू तस्करीवर देखील पोलिसांचा वॉच राहणार आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्था बिघडवणारे गुंड ठाणे पोलिसांच्या निशाण्यावर असून त्यांच्यावर विविध कायद्याअंतर्गत तडीपार, स्थानबद्धतेसारख्या प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. एमपीडीए (झोपडपट्टी दादा कायदा) आणि तडीपारी या माध्यमातून गुन्हेगारी कारवायांना लगाम लावला जाणार आहे. निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांनी करडी नजर रोवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालयातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून अशा उपद्रवी गुन्हेगारांची यादी मागवली आहे. पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या याद्या बनविल्या गेल्या आहेत. त्या गुंडाची दहशत, सक्रियता पाहून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे स्वरूप ठरविले जाणार आहे.