पिंपरी : फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाकड परिसरात एकाच दिवशी ४०६ वाहनांवर कारवाई केली. वाकड आणि थेरगाव परिसरात केलेल्या कारवाईत चार लाख ३७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाकड येथे एकूण ३०५ वाहनांच्या काळ्या काचा पोलिसांनी उतरवल्या आहेत. दंडात्मक कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा कारवाई होत असल्यास ५०० रुपये दंड केला जातो. एकदा कारवाई करूनही काळ्या काचा काढल्या नाहीत, तर पुन्हा कारवाई करताना वाहनचालकावर १५०० रुपयांचा दंड केला जातो. वाकड येथील कारवाईत दोन लाख ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. थेरगाव येथील पदमजी पेपर मिलसमोर कारवाई केली.
रस्त्यावर पार्किंग केलेल्या ४७ वाहनांवर कारवाई करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. शहरात सोनेरी रंगाची ऑडी मोटार घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकावरही काचांना काळी फीत लावल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी दंड आकारला. गाडीला हवा तो रंग द्या, पण काचेला काळी फीत, फॅन्सी नंबर प्लेट लावण्यापासून दूर राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी केले.