मुंबई : राज ठाकरेंचे होम ग्राऊंड असलेल्या ‘शिवतीर्था’वर १७मे ला महायुतीची जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवतीर्थावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येत असल्याने मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी हा ‘राजयोग’ ठरणार असल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील या सभेच्या नियोजनासाठी शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, आरपीआय आठवले गटाचे सर्व नेते आणि पदाधिकारी कंबर कसून कामाला लागले आहेत. शिवतीर्थावरील ‘राज’आदेशानंतर तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मनसे नेते अधिकच सक्रिय झालेले पाहायला मिळतात. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ‘आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सभा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणारी सभा.’ असे मत वक्तव्य केल्यानंतर आता मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी देखील ‘मनसेच्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी येणार ही मनसे कार्यकर्त्यांना आनंदाची पर्वणी’ असल्याचे म्हटले आहे.
ठाणे येथे माध्यमांशी संवाद साधताना अविनाश जाधव म्हणाले की, पहिल्यांदा पंतप्रधान मोदी शिवतीर्थावर सभा घेणार असून ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा असणार आहे. आम्हा सर्व मनसैनिकांसाठी ही आनंदाची पर्वणी असणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून लाखोंच्या संख्येने मनसैनिक १७ तारखेला शिवतीर्थावर उपस्थित राहणार आहेत. आम्ही मैदानासाठी आधी अर्ज भरल्याने आम्हाला परवानगी मिळाली आहे, यात डावलण्याचा प्रश्नच येत नाही. आतापर्यंत ‘त्या’ ठाकरेंनी राज ठाकरेंना खूप त्रास दिला. त्यावेळेला ठाकरे विरोधात ठाकरे का नाही दिसलं. जे त्यांना आता दिसत आहे. आधी आम्ही मोदींच्या विरोधात बोलायचो आता ते ठाकरे मोदींच्या विरोधात बोलतायत. राज ठाकरे जे बोलतात तेच पुढे जाऊन उद्धव ठाकरे करतात, यावरुन एकच कळतं की राज ठाकरे बरोबर आहेत. अशा खोचक शब्दांत अविनाश जाधव उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, महायुतीचे सरकार आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. जिथे जिथे मनसेची दीड ते दोन लाख मत आहेत तिथे शेवटचं मत महायुतीला पडेपर्यंत आम्ही सोबत राहणार आहोत, असे देखील अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.