नव्वी मुंबई : फेसबुकवरुन अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे नवीन पनवेल भागात राहणारया एका ४२ वर्षीय महिला शिक्षिकेला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने ज्या अनोळखी व्यक्तीसोबत फेसबुकवरुन मैत्री केली. त्या व्यक्तीने या महिलेला इंग्लड येथून ऍपल फोन, लॅपटॉप, ज्वेलरी, ६९ लाखाची रक्कम व इतर भेटवस्तू पार्सल पाठवल्याचे भासवून सदरचे पार्सल कस्टमच्या तावडीतून सोडवण्याच्या बहाण्याने शिक्षिकेला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये तब्बल ३१ लाख रुपये पाठविण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर गुन्हेगारांच्या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी एक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील ४२ वर्षीय तक्रारदार महिला नवीन पनवेलमध्ये दोन मुलांसह राहण्यास असून त्या एका शाळेमध्ये शिक्षक म्हणुन काम करत आहेत.
गत मार्च महिन्यामध्ये एका सायबर चोरट्याने ब्रिटीश असल्याचे भासवून या शिक्षिकेच्या फेसबुकवर डॉ. फेलिशिया प्रिन्स या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्यासोबत मैत्री केली होती. त्यानंतर भामट्या डॉ. फेलिशिया याने चॅटींगद्वारे व व्हॉट्सऍपवरुन बोलणे करुन त्यांच्यामध्ये खास मैत्री झाल्याचे भासवले. त्यानंतर डॉ. फेलिशिया याने इंग्लड येथून ऍपल फोन, लॅपटॉप, ज्वेलरी, ६९ लाखाची रक्कम इतर भेटवस्तू पाठवल्याचे शिक्षिकेला सांगून त्याचे फोटो त्यांना पाठवले. मात्र दोन दिवसानंतर सायबर टोळीतील नेहा नावाच्या महिलेने दिल्ली येथील कस्टम आफिसर असल्याचे भासवून या शिक्षिकेला संपर्क साधला. तसेच त्यांच्या नावाने परदेशातून आलेल्या पार्सलचे कस्टम चार्जेस त्यांना भरावे लागेल असे सांगितले. या शिक्षिकेने सदरची बाब भामट्या डॉ. फेलिशिया याला सांगून तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्याने त्याच्या कष्टाचे पैसे असल्याचे सांगून सदर भेटवस्तू खास तिच्यासाठी पाठवल्याचे सांगून तिला भावनिक केले. त्यामुळे या शिक्षिकेने २५ हजाराची रक्कम पाठवून दिल्यानंतर सायबर टोळीने इन्कमटॅक्स, फॉरेन मनी रजिस्ट्रेशन चार्ज, कस्टम डयुटी चार्ज, ओनरशिप सर्टिफीकेट पेपर चार्ज, एशियन युनियन क्लिअरिंग सर्टिफिकेट चार्ज अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना ३० लाख ९६ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतर देखील या सायबर टोळीकडून वेगवेगळी कारणे सांगून त्यांना पैसे पाठविण्याबाबत सांगण्यात येत होते. हा प्रकार या शिक्षिकेने आपल्या मित्राला सांगितल्यानंतर त्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगितले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या शिक्षिकेने नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.