मुंबई : गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसांच्या माध्यमातून व्यवसायात प्रतिस्पर्धी असलेल्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला आहे. पोलीसांनी याप्रकरणी ४ गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतु्से हस्तगत करुन दोन आरोपींना अटक केली आहे. काशी मिरा पोलीस ठाणे व गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे ही कामगिरी पार पाडली. गोल्डन नेस्ट सर्कल जवळ असणाया अलम स्टील अँड फर्नीचर येथे काम करणाया इसमांकडे विनापरवाना पिस्तूल व जिवंत काडतूसे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्याप्रमाणे चौकशी केल्यानंतर फिरोज आलम शफीऊल्ला चौधरी याच्या ताब्यात १ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुस तर शाकीर अब्दुल वहाब चौधरी याच्या ताब्यात १ गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतूसे आढळून आली. त्यानंतर आरोपींकडे अधिक चौकशी केली असता फिरोज ऊर्फ इब्राहीम आलम शफीऊल्ला चौधरी याला अमान स्टिल किचन इक्वीपमेंटचे मालक अनिस ऊर्फ मुन्ना खान व कमिल खान त्याचप्रमाणे शादाब स्टीलचा मालक शादाब यांच्या मुळे व्यवसायामध्ये भरपुर नुकसान झाले होते. त्यांना धडा शिकविण्यासाठी चौधरी याने त्याच्याकडे पूर्वी काम करणारा मुस्लीम याच्याकरवी ६ गावठी पिस्तूले व जिवंत काडतूसे मागवली.
त्यापैकी दोन गावठी पिस्तुले व जिवंत काडतूसे त्याने तीन दिवसांपूर्वी अनिस ऊर्फ मुन्ना खान यांच्या नकळत त्यांच्या दुकानात ठेवली तर दोन पिस्तुले व १२ काडतूसे त्याने एका बॅगेमध्ये ठेवून ते वर्सोवा पुलावरुन खाडीत फेकुन दिले. तसेच त्याच्याकडे सापडलेले पिस्तुल व काडतूसे तो एक दोन दिवसात कमिल खान यांच्या दुकानात ठेवणार होता. त्याचप्रमाणे दूसरा आरोपी शाकीर अब्दुल वहाब चौधरी याच्या ताब्यात मिळून आलेले पिस्तुल व काडतूसे तो एक दोन दिवसात शादाब यांच्या दुकानात ठेवणार होता अशी कबुली आरोपींनी दिली, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे, परिमंडळ – १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलिस निरी अविराज कुराडे, काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे, यांच्या पथकाने पार पाडली.