मुंबई : पश्चिम रेल्वेच्या बॅटमॅन पथकाने गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या कारवाई अभियान हाती घेतले आहे. या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आता तिकीट घेऊन प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे. बॅटमॅन पथकांच्या तपासणीनंतर काही रेल्वे स्थानकाच्या तिकीट विक्रीत सरासरी आठ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. लोकलमधून रात्री अनेक प्रवासी बिनधास्तपणे विनातिकीट प्रवास करत असल्याच्या तक्रारी रेल्वेला प्राप्त झाल्या होत्या. विशेष म्हणजे, रात्री आठनंतर लोकल स्थानकावर तिकीट तपासणी जवळपास बंद असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी फुकट्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे रात्री लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने बॅटमॅन (बी अवेअर टीटीई मॅनिंग ॲट नाइट) या पथकाची स्थापना केली असून हे पथक रात्रीच्या वेळेस तिकीट तपासणी करून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत आहे.
बॅटमॅन पथकाने दादर, बोरिवली, विरार, कांदिवली आणि भाईंदर स्थानकांत तिकीट तपासणी केली आहे. या तिकीट तपासणी मोहिमेतून स्थानकांतून तिकीट विक्री वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दादर स्थानकात ४-५ मार्च रात्री बॅटमॅन पथकाची नियुक्ती करून तपासणी करण्यात आली होती. बॅटमॅन पथकांच्या तपासणीआधी २,५७९ तिकीटांची विक्री झाली होती. तपासणीनंतर ही विक्री ३,७६४ पर्यंत पोहोचली आहे. दादरप्रमाणे बोरिवलीमध्ये ११.८३ टक्के, विरारमध्ये ६२.१६ टक्के, कांदिवलीमध्ये १७.४४ टक्के आणि भाईंदरमध्ये १०.५५ टक्के तिकीट विक्री वाढली आहे.