मुंबई/पुणे : राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, विविध कारणांमुळे काही काळ बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाकडून आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली असून लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका मांडली. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे केंद्रांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था उभी करून लाभार्थ्यांना भोजन पुरविण्याचे कार्य सुरू ठेवले. राज्यातील एकूण ४२ शिवभोजन केंद्रांपैकी ४१ केंद्रे नियमितपणे कार्यरत असून केवळ काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या अडचणी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये गॅस पुरवठ्याच्या समस्येमुळे काही काळ कामकाजावर परिणाम झाला होता, ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे, त्या ठिकाणच्या शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देता येईल, असे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले. त्यामुळे भविष्यात गॅस पुरवठ्याशी संबंधित अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम घरगुती गॅस ग्राहकांना प्राधान्याने पुरवठा केला जातो. त्यानंतर व्यावसायिक ग्राहकांना गॅस उपलब्ध करून दिला जातो. याच कारणामुळे काही भागांत व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांचा कारभार सुरळीत सुरू राहावा आणि गरजू नागरिकांना कमी दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. शिवभोजन योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही, तसेच केंद्रांचे कामकाज नियमित आणि प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मंत्री छगन भुजबळ यांनी केला.







