मुंबई : मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे रेल्वेस्थानक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये दुर्गंधीमुक्त स्वच्छतागृहासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग मध्य रेल्वेने केला आहे. युरिनलमधील पाणी वाहून नेणाऱ्या पाईपमध्ये ‘ओलरट्रॅप’ नावाचे उपकरण बसविले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने दुर्गंधीवर नियंत्रण मिळवण्यास रेल्वे प्रशासन यशस्वी ठरले आहे. यंत्रणेमुळे स्वच्छतागृह वारंवार धुण्याची गरज भासत नसल्याने रोज किमान पाच हजार लिटर पाण्याची बचतही होत आहे, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.
वर्दळीचे स्थानक असल्याने येथील स्वच्छतागृहात जाताना प्रवाशांना नाक दाबूनच जावे लागते. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी अधिकाधिक पाण्याची गरज लागते. पारंपारिक पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी खूप पाण्याचा वापर होतो. स्वच्छतागृहे दुर्गंधीमुक्त करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही यंत्रणा पर्यावरणपूरक आहे. दिवसातून एकदा साफसफाई करणे या यंत्रणेमुळे पूरक ठरत आहे. यंत्रणा यशस्वी ठरल्यास अन्य रेल्वे स्थानकांतील स्वच्छतागृहांमध्येदेखील ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
- फलाट क्रमांक १३ वरील स्वच्छतागृहाचा रोज किमान सहा हजार प्रवाशांकडून वापर.
- प्रवासी वापर अधिक असल्याने स्वच्छतागृहात सातत्याने स्वच्छतेची गरज.
- मिलन सभागृहातील स्वच्छतागृहामध्ये दुर्गंध रोखणारी यंत्रणा कार्यान्वित.
- रोज पाच हजार लिटर पाणी बचतीचा मध्य रेल्वेचा दावा.
- मूत्रालयातील पाणी वाहून नेणाऱ्या नळीमध्ये एक यंत्रणेचा उपयोग.
- स्वच्छतागृहाचा वापर होत असताना पाणी जाण्यासाठी ही यंत्रणा सुरू होते.
- स्वच्छतागृहाचा वापर नसल्यास ही यंत्रणा नळी बंद करते.
- नळी बंद केल्याने अमोनियामिश्रित दुर्गंधी स्वच्छतागृहात पसरत नाही.
- ओलरट्रॅप यंत्रणेमुळे स्वच्छतागृहाच्या प्रत्येक वापरानंतर पाणी वापरण्याची गरज भासत नाही.