मुंबई : मध्य रेल्वेवर फुकटया प्रवाशांचा सुळसुळाट झाला असून गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ४६ लाख ८६ हजार फुकटे प्रवासी आढळून आले होते. त्यांच्याकडून रेल्वेने तब्बल ३०३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. फुकटया प्रवाशांकडून एवढया मोठया प्रमाणात दंड वसूल करण्याची ही विभागीय रेल्वेची पहिलीच वेळ आहे.
मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांबरोबरच लांब पल्ल्याच्या मेल एक्प्रेस गाड्यांमध्येही विनातिकीट प्रवास करणा-याची संख्या मोठी असल्याचे रेल्वेच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रेल्वेने विशेष तपासणी मोहीम राबवली असून त्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहेचालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एप्रिल – जून २०२३ पर्यंत केलेल्या तपासणीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची ५ हजार २५३ प्रकरणे नोंदवण्यात आली असून दंडाच्या माध्यमातून रेल्वेला ३४.१२ लाख रुपये मिळाले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर तत्काळ कारवाई करता यावी म्हणून मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, भुसावळ, मनमाड, खांडवा, नागपूर, दौड आणि पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे दंडाधिकारी नियुक्त केले आहेत. त्यामुळे संबंधित दोषी प्रवाशांवर तत्काळ कारवाई करून दंड वसूल करणे शक्य होत आहे..