मुंबई : उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने अंधेरी आणि बोरिवली येथे अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रे उभारली असून त्यामुळे आता नागरिकांना कार्यालयात न येता घरपोच विविध दाखले व्हॉटस् अपवर उपलब्ध होणार आहेत. या केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. नवीन सेतू सुविधा केंद्रे डिजिटल क्यू मॅनेजमेंट, टोकन प्रणाली, रियल-टाइम स्टेटस डिस्प्ले आणि आरामदायक प्रतीक्षालय अशा अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असून, नागरिकांचा वेळ वाचवणे आणि सेवा प्रक्रिया सुलभ करणे हे या केंद्रांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.
सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी यंत्रणा नसून सरकार आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू आहे. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अखंड सेवा देण्याच्या दिशेने हे केंद्र भविष्यकालीन स्मार्ट प्रशासनाचा एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालक मंत्री अॅड. आशीष शेलार, सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा आदी यावेळी उपस्थित होते. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या या जिल्ह्यात नागरिकांचे जीवनमान सुकर व्हावे या अनुषंगाने त्यांना वेगवान, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित सेवा मिळाव्यात या उद्देशाने मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने उभारलेल्या या केंद्रांचे लोकार्पण आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आले. शासनाच्या शंभर आणि दीडशे दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा व ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपाययोजनांचा जिल्ह्यातील आरटीएस सेवा वेळेवर वितरीत करण्यावर सकारात्मक परिणाम झाला असून एप्रिल २०२५ मध्ये ५९.४८ टक्के असलेले हे प्रमाण आता ऑक्टोबर २०२५ पर्यंत ९०.२८ टक्क्यांवर गेले आहे. प्रशासकीय पातळीवर हे प्रमाण शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.







