वृत्तसंस्था : भारतातील कोट्यवधी यूजर्स यूपीआयचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करतात. अगदी किराणा सामान खरेदीपासून मोठमोठ्या मॉलमध्ये शॉपिंगसाठी यूपीआय पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या मोबाईलमध्ये यूपीआय असते. त्यामुळे यूपीआयमध्ये कोणताही बदल झाल्यास त्याचा परिणाम सर्वांवर होतो. असाच एक बदल १ ऑक्टोबरपासून होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI अॅप्सवरील P2P (पिअर-टू-पिअर) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा १ ऑक्टोबर २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे फोनपे, जीपे यांसारख्या अॅप्सवर मित्र किंवा नातेवाइकांकडून थेट पैसे मागण्याची सुविधा बंद होईल. ही सुविधा यूजर्सना दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवता येत होती, परंतु आता ती केवळ सुरक्षिततेसाठी बंद केली जाणार आहे.
आतापर्यंत, UPI वर कोणाकडूनही पैसे मागण्यासाठी यूजर्स अॅपद्वारे त्या व्यक्तीचा UPI आयडी टाकून रिक्वेस्ट पाठवू शकत होते. उदाहरणार्थ, ₹१००० मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली जायची, आणि समोरच्या व्यक्तीने पिन टाकून ती स्वीकारल्यास पैसे मिळायचे. आता ही सुविधा केवळ व्यापारी साइट्ससाठी मर्यादित राहील. आयआरसीटीसी, फ्लिपकार्ट, अमेजोन यांसारख्या व्यापारी वेबसाइट्सना पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्याची परवानगी असेल, परंतु सामान्य यूजर्स याचा वापर करू शकणार नाहीत. ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी NPCI ने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, फसवणूक टाळण्यासाठी कलेक्ट रिक्वेस्टची मर्यादा ₹२००० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती. आता ही सुविधा पूर्णपणे बंद करून UPI पेमेंट अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे, कारण फसवणूक करणाऱ्यांनी या सुविधेचा गैरवापर करून अनेकांना लुबाडले आहे. UPI ची ही सुविधा व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि मित्र-नातेवाइकांना थकबाकीची आठवण करून देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. तसेच, ऑनलाइन खरेदीच्या पेमेंट्स सोप्या करण्यासाठीही ती उपयुक्त होती. मात्र, फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.







