पुणे : पुण्यासह देशभरामध्ये मकर संक्रांतीची जोरदार तयारी सुरु आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रंगीबेरंगी पतंग उडवले जातात. त्याचबरोबर एकमेकांच्या पतंगी कापण्याची स्पर्धा देखील लागलेली आहे. मात्र या स्पर्धेच्या इर्षेमध्ये नायलॉन मांजा वापरला जातो. नायलॉन मांज्यामुळे अनेक पक्ष्यांचे आणि गाडी चालवणाऱ्या लोकांचे प्राण जात आहे. पुण्यामध्ये देखील अशाप्रकारे नायलॉनचा मांजा वापरला जात असून त्याच्या विक्रीवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुणे पोलीस मांजा विक्रेत्यासह त्याची डील करणाऱ्या डिलरवर देखील लक्ष ठेवून आहे. धारदार नायलॉनच्या मांजाचा जीवघेणा खेळ थांबविण्यासाठी मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याचा आक्रमक पवित्रा पुणे पोलिसांनी घेतला आहे. शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. यापूर्वीही या धारदार मांजामुळे अनेक नागरिक जखमी झाल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही शहरात अशा मांजाची विक्री होत असल्याचे प्रकार पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर आला आहे. यापुढे नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी कडक पाऊले उचलली असून आता नायलॉन मांजा विक्री करण्याबरोबर, मांजा विक्री करणारे डिलर आणि असा मांजा उत्पादन करणारे यांच्यावर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे अशी अवैध मांजा विक्री व उत्पादन पोलिसांच्या रडारवर आले आहे. पुणे शहरातील आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दरवर्षी हा नायलॉन मांजा बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर येथे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र कारवाई केवळ मांजा विक्रेता करणार्या दुकानावर होते. परंतु, मांजाची डिलर आणि मांजाचे उत्पादन करणारे याला कारणीभूत ठरतात त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे मांजाचे डिलर आणि उत्पादन कर्त्यांवर कारवाई केली जाणार आहे. २०२७ पासून हानिकारक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बारीक काचेचा लेप असलेला मांजा शहराच्या अनेक दुकानांमध्ये सर्रास विकला जात आहे. पुणे शहरात गेल्या पाच वर्षांत नायलॉन मांजाचे किमान १६ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. २०२३ मध्ये ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २०२४ मध्ये पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात अशा असंख्य घटना घडल्या आहेत मात्र पुढे येऊन तक्रारी न दिल्याचीही उदाहरणे आहेत. पतंग काटा काटीच्या स्पर्धेसाठी शहरात प्रामुख्याने डिसेंबर महिन्यापासूनच नायलॉन मांजा विक्रीला सुरुवात होते. चोरट्या पध्दतीने हा मांजा बाजारात पुरविला जातो. हा मांजा पतंग उडविण्यासाठी व त्यातून आनंद घेण्यासाठी नाही तर आकाशात उडणार्या पतंग काटाकाटीच्या स्पर्धेसाठी वापरला जातो. त्यासाठी पतंग उडविणार्यांकडून दुसर्यांच्या पतंग कापण्यासाठी अधिक धारदार मांजाचा शोध घेतला जातो. या काटाकाटीच्या स्पर्धेतच अशा नायलॉन मांजा बाजारात येत असतो. मुळात ही काटाकाटीची स्पर्धाच संपली तर असा धारदार मांजाही बाजारात येण्यास आपोआप मज्जाव येईल.
“मकरसंक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडवताना या धारदार धाग्याचा वापर केला जातो. त्यानंतर अडकलेला मांडा हा झाडांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अडकला जातो. यामुळे अनेक नागरिक, प्रवासी, पक्षी आणि दुचाकी चालक गंभीर जखमी होतात. तसेच अनेकांचे प्राण देखील जातात. याचा सर्वाधित फटका पशू पक्षांना बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही चोरून मांजा विक्री करणारे, मांजाची डिलींग करणार्यांवर व मांजाचे उत्पादन करणार्यांपर्यंत पोहचून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती पुणे शहराचे अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.