मुंबई : माहीम दर्ग्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही १० आणि ११ डिसेंबर रोजी कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला सायंकाळी ७ ते १० ऐवजी सायंकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत परवानगी देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. तथापि, दर्ग्यात किंवा त्याबाहेरील आवारात कोणताही जल्लोषास कायद्याने परवानगी देता येणार नसल्याचे अधोरेखीत करून याबाबतचा कायदा तुम्हाला माहीत नाही का ? असे खडेबोलही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारताना सुनावले,
यशवंत गंगावणे यांनी या मागणीसाठी याचिका केली होती. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही याचिका मंगळवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी कार्यक्रम बुधवारीच असल्याचे सांगून याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली. तसेच, या कार्यक्रमाला आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. तथापि, अतिरिक्त वेळेसाठी याचिका करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, दर्ग्यात किंवा त्याबाहेरील आवारात कोणताही जल्लोष करण्यास कायद्याने मज्जाव आहे. कायद्याने अशी परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे नमूद करताना याचिकाकर्त्यांना याबाबत कायदेशीर तरतूद नसल्याचे माहीत नाही का ? या प्रश्नाचा न्यायालयाने पुनरूच्चार केला. त्याचवेळी, अशा याचिका अखेरच्या क्षणी करण्यात येत असल्यावरून प्रश्नही उपस्थित केला. तेव्हा, ही याचिका १२ वेळा सादर करण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, आज पहिल्यांदा याचिका सुनावणीसाठी आल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.







